पद्मश्री पुरस्कार से सम्मानित ज्येष्ठ गुरु तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
Taalyogi Pandit Suresh Talwalkar
सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक
क्षेत्रात आपल्या सृजनशील आणि मौलिक कार्याची लक्षणीय भर घालून, महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्तीस, समाजाच्या मनातील कृतज्ञतेची खूण म्हणून ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या वतीने प्रतिवर्षी ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या सांस्कृतिक क्षेत्रीय जीवनगौरव पुरस्कारासाठी पं. सुरेशराव तळवलकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वश्री सुधीर जोगळेकर, दीपक करंजीकर, मनोज जोशी, सारंग दर्शने, नविन काळे आणि सौ. मंजिरी मराठे या मान्यवरांच्या निवड समितीकडून एकमताने ही निवड करण्यात आली आहे. पं. सुरेशराव तळवलकर यांनी सातत्याने गेली अनेक वर्षे आपल्या सकस सर्जनशीलतेच्या, अव्वल दर्जाच्या बुद्धिमंत प्रतिभेने, तालवाद्य कला प्रकारात बहुमोल भर घातली आहे. वादन कलेतील, खासकरून तबला वादनातील प्राविण्य हे केवळ ‘स्वांत सुखाय’ मर्यादित न ठेवता गुरु-शिष्य परंपरेचे पाईक होऊन, आपल्या गुरुंकडून मिळालेला वारसा त्यांनी हजारो शिष्यांच्या हाती सुपूर्द केला आहे आणि आजही करीत आहेत. अत्यंत कष्टपूर्वक तालवाद्यांच्या सर्व प्रकारांना आत्मसात करून संशोधनपूर्ण अभ्यासाने त्यात भर घालून अनेकानेक नवोन्मेषी प्रयोगांनी समाजाच्या सांस्कृतिक संचितात लाभलेले पं. सुरेश तळवलकर यांचे हे योगदान म्हणूनच सर्व कलासक्त, संवेदनशील, अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठीही अभिवादनास पात्र आहे.
“चतुरंग’ रंगसंमेलनात सन्मानपूर्वक प्रदान” पं. सुरेशरावांच्या जीवनभरच्या या व्यापक कार्याचा, त्यातील चिंतनशील अभ्यासगर्भ कार्याचा विचार करून निवड समितीने यंदाच्या या पुरस्कारासाठी पं. सुरेश तळवलकर यांची निवड केली आहे. डिसेंबर २०२६मध्ये होणाऱ्या ‘चतुरंग’ रंगसंमेलनात पं. सुरेश तळवलकर यांना हा ‘जीवनगौरव पुरस्कार’ सन्मानपूर्वक ‘प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरुप” मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे या ‘चतुरंग जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी ‘चतुरंग’चा हा सांस्कृतिक क्षेत्रिय पुरस्कार सर्वश्री भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, श्री. पु. भागवत, नृत्यगुरू पार्वतीकुमार, नटवर्य भालचंद्र पेंढारकर, पं. सत्यदेव दुबे, डॉ. अशोक रानडे, सदाशिवराव गोरक्षकर, सौ. विजया मेहता, सुहास बहुळकर, राजदत्त, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर अशा अनेक मान्यवर दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.
Chaturang Pratishthan
Source: Facebook